विवेकवाद म्हणजे काय?- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech/ vivekvad mhanje kay

13 هزار بار بازدید - 2 سال پیش - बुद्धी माणसाची नोकर आहे. भावना
बुद्धी माणसाची नोकर आहे. भावना माणसाची मालक आहे. बुद्धी जास्त गोड खाऊ नये, नियमित व्यायाम करावा, परस्त्रीकडे वासनेच्या नजरेने पाहू नये असे सांगते. मात्र भावना यापेक्षा वेगळेच वर्तन घडवते. कोठे जावयाचे हा मार्ग बुद्धी दाखवते. मात्र त्या मार्गाने जावयाचे की नाही, हा निर्णय भावना घेते. ग्रंथालयाचा रस्ता आणि अभ्यासाची गरज व्यक्तीच्या विचाराला माहीत असते. पण भावना त्याचे पाय सिनेमागृहाकडे किंवा मद्यालयाकडे वळवते. यासाठी माणसाच्या मेंदूला औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने विवेकाचे शिक्षण देणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहेच. दुसरा मार्ग म्हणजे सर्वांप्रती प्रेम, स्नेह, करुणा या भावनेनेच जीवन उद्युक्त करावयाचे. परंतु या भावनांच्या पूर्ततेसाठीचा आचार मात्र ज्ञानाने मार्गदर्शन केलेल्या विचाराने करावयाचा. बर्ट्रांड रसेल या श्रेष्ठ विवेकवाद्याच्या मते- Our life should be inspired by love and guided by knowledge.

विवेकवादी विचार मांडले, की हमखास एक प्रश्न उपस्थित होतो, तो असा, की नुसते बोलण्याने काय होणार? आचरणात आणण्याची हिंमत असेल, तरच बोला. वरवर आकर्षक वाटणारे हे विधान खरे नाही. 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' असे म्हणतात.  अर्थात अशी 'वंदनीय पाऊले' थोडीच असणार. हे उघड आहे. पण असे वागणे शक्य नाही, म्हणून तसे बोलूही नये हे म्हणणे योग्य नाही. सुधारककार आगरकर यांनी लिहिलेले एक वाक्य असे आहे, 'इष्ट ते बोलणार व साध्य असेल ते करणार' ही व्यावहारिक मर्यादा लक्षात घ्यावयास हवी. यामुळेच विवेकवादी कार्याचे सहा टप्पे होतात. विचार, उच्चार, प्रचार, संघटन, आचार व संघर्ष असे सहा टप्पे आहेत. योग्य विचार समजून घेण्यासाठी कष्ट घेणे हा पहिला टप्पा आहे. संभ्रमात टाकणारे अनेक भुलभुलये समाजात तयार असतात वा मुद्दामहून केले जातात. त्यांमधून योग्य विचार निवडणे सोपे नाही. या विचारांचा उच्चार करणे हे केवळ वाचाळ वीरत्व नसते, तर ते बोलणे हाच एक संघर्ष असतो. पत्रिका न पाहता लग्न करा, शरीरात आत्मा नसतो, जन्माधिष्ठित उच्चनीचता ही साफ चूक आहे, म्हणून जात न मानता आंतरजातीय लग्न करा- हे विचार वैज्ञानिक दृष्टिकोनाने समाजात मांडणे हेदेखील संघर्षाचे कारण ठरू शकते. उच्चाराच्या पुढच्या टप्प्यावर प्रचार येतो. विचार पटलेल्या अनेक माणसांनी अनेक ठिकाणी अनेक वेळी त्या विचाराचा उच्चार करणे चालू केले, की तो विचार प्रचार बनतो. पुरेसा प्रभावी प्रचार झाल्यास तो विचार जनसमुदायाच्या मनाची पकड घेतो व त्याप्रमाणे समाजकारण अथवा राजकारण बदलण्यास मदत करतो. अर्थात, विचाराचा प्रसार हा प्रभावी ठरण्यासाठी त्याला संघटनेमार्फत संघटित रूप देणे योग्य, परिणामकारक ठरते. विवेकवादाच्या वाटचालीतील हे चार टप्पे तरी अवलंबण्याचा प्रयत्न करावयास हवा. विचाराप्रमाणे आचार केल्यास व गरज पडल्यास त्यासाठी संघर्ष केल्यास विवेकवादी कार्य झपाट्याने पुढे सरकते. आंतरजातीय लग्न करणे इष्ट आहे, असे सांगणाऱ्या व्यक्तीने स्वतः अथवा घरात आंतरजातीय लग्न केल्यास त्याच्या सांगण्याची परिणामकारकता कितीतरी वाढते. पण 'आचार करणार असाल, तरच उच्चार करा' ही पूर्वअट उपयोगी नाही. व्यक्तीची ती प्रामाणिक मर्यादा मानावयास हवी. अर्थात, मर्यादा व दांभिकता यातील फरक समाज ओळखून असतो. योग्य विचाराचा उच्चार करणाऱ्या माणसाने त्यासारखे वर्तन केले नाही, तरी त्याविपरीत वर्तन करता कामा नये. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीने स्वतः तो केला नाही, तरी तसा विवाह करणाऱ्यांना शक्य ती मदत करावयास हवी व अशा लग्नांच्या विरोधात तर कधी जाता कामा नये.
डॉ. नरेंद्र दाभोलकर (तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तकातून)

vachta vachta aikta aikta/ वाचता वाचता ऐकता ऐकता या यू ट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
@siddharth.72
2 سال پیش در تاریخ 1401/09/27 منتشر شده است.
13,009 بـار بازدید شده
... بیشتر